Home ठळक बातम्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात किल्ले बांधणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात किल्ले बांधणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

8
0

“येणाऱ्या पुढच्या पिढीला आपल्या वैभवशाली इतिहासाची माहिती मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी सद्यस्थितीमध्ये असलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे, त्यांचे जतन करणे गरजेचे आहे” असे आवाहन सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात संपन्न झालेल्या किल्ले बांधणी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे मुख्य अतिथी, इतिहास संशोधक व दुर्गसंवर्धक डॉ. श्रीदत्त राऊत यांनी याप्रसंगी केले. तसेच “उत्तर कोकणातील दुर्गवैभव आणि आणि त्याच्या संवर्धनाची गरज” ह्या विषयावर त्यांनीं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पालघर जिल्ह्यातील विविध दुर्लक्षीत किल्ल्याची माहिती देऊन त्यांचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले.
सध्याच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वारसा असलेल्या गड-किल्ल्यांची आठवण व्हावी, त्यांचे संवर्धन करावे, विद्यार्थ्यांमध्ये संघभावना वृद्धिंगत व्हावी अशा उदात्त हेतूने पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील ६२ गटांमध्ये सुमारे ३६० विद्यार्थी सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थ्यांनी दगड, विटा आणि माती पासून तब्बल ६२ विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या.
पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्ष व संस्थेचे सचिव प्रा. अशोक ठाकूर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे येण्याची गरज व्यक्त केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी, “विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये असलेली अगणित ऊर्जा सकारात्मक, विधायक कार्यासाठी वापरावी” असे सांगून या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. महाविद्यालयाचे पर्यवेक्षक आणि स्पर्धा समिती प्रमुख प्रा. महेश देशमुख यांनी स्पर्धेविषयी माहिती दिली. याप्रसंगी संस्थेचे सदस्य श्री. सुधिरभाऊ दांडेकर, श्री. धनेशभाई वर्तक, पर्यवेक्षिका डॉ. उषाराणी यादव, सौ. प्रिती फणसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
वरिष्ठ महाविद्यालयातील रोहित भावर, गौतम कोम, मानसी संखे, मनीषा भुसार, समीक्षा तामोरे व पूजा भालेराव तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील सानिया शेख, नियती शहा, स्नेहा दत्ता, इशिका पटेल, अर्फी गुप्ता व जिनल जैन हे विद्यार्थी विजेते ठरले. या स्पर्धेच्या आयोजनासाठी माहिती तंत्रज्ञान विभागामधिल श्री.तुषार पाटील, यतिश सातवी, हिना शेख, अनुजा पाटील, हिमांशू पाटील, संदेश मेरे, नितीन पवार, मनिष पाटील, उमेश मोरे, इतिहास विभागातील श्री.रामदास येडे यांचे विशेष योगदान लाभले.