Home ठळक बातम्या केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता

केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता

13
0

दीपक मोहिते,

केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली असून अनलॉक-३ मध्ये अनेक सवलती जाहीर केल्या आहेत.त्यामध्ये मॉल,शॉपिंग सेंटर्स,जिम व योगा सारख्या फिटनेस सेंटर्सना देखील शिथिलता देण्यात आली आहे.परंतु राज्यातील कॊरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने ५ ऑगस्ट पाडून आउटडोर व्यायामशाळा,जिम्नॅस्टिक यांनाच परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्र व राज्य सरकार यांच्यामध्ये योग्य समन्वयाचा अभाव असल्यामुळे राज्यात सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे.राज्यात कॊरोना बाधितांचा आकडा चार लाखाच्या पार गेला आहे,तर सुमारे पंधरा हजार नागरिक या आजाराने मृत्युमुखी पडले आहेत.राज्यात रिकव्हरी रेट सुधारत असला तरी घाई करून चालण्यासारखे नाही.कारण पुणे,ठाणे व नवी मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर गेली असून ती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्नशील असूनही प्रादुर्भाव सतत वाढत चालला आहे.मुंबईसारख्या शहरातील प्रादुर्भाव आटोक्यात आला असला तरी इतर भागात मात्र प्रादुर्भावाला प्रचंड वेग आला आहे,त्यामुळे सवलती देताना राज्य सरकारने सावध भूमिका घेतली आहे.सलग चार महिन्याच्या लॉकडाऊनमुळे लोकांचा उद्रेक होईल,अशा भितीतून आता केंद्र सरकार विविध सवलती देऊ करत आहे.मॉल,शॉपिंग सेंटर्स,शाळा-कॉलेजेस व रेल्वे ही सारी गर्दीची ठिकाणे असून ती तूर्तास बंद ठेवणेच उचित होईल.ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव,ही चिंतेची बाब असून सरकारने वेळीच दखल घेऊन आपल्या यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज आहे.कारण शहरी भागासारख्या वैद्यकीय सोयी-सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध नाहीत.त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनांवर मर्यादा येत असतात.त्यामुळे ग्रामीण भागात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणता कामा नये..