Home ठळक बातम्या वसई तालुक्यातील एकाही ग्राहकाची वीज खंडित करु नये!

वसई तालुक्यातील एकाही ग्राहकाची वीज खंडित करु नये!

10
0

शिवसेना पालघर उपजिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांचे महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन

प्रतिनिधी

विरार : वसई तालुक्यातील एकाही ग्राहकाची वीज महावितरण कंपनीने कोणत्याही परिस्थितीत खंडित करू नये; अशा विनंतीचे निवेदन शिवसेना पालघर उपजिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांनी वसई महावितरणचे अधीक्षक अभियंता मंदार अत्रे यांना गुरुवारी सुपूर्द केले. या वेळी तेंडोलकर यांनी नागरिकांच्या विद्युत विभागासंबंधित इतर अनेक समस्यांवरही चर्चा करून लेखी स्वरुपात सूचना केल्या.

वसई तालुक्यातील वीज ग्राहकांची मागील तीन महिन्यांची वीजबिले ऑनलाइन पाठवण्यात आली आहेत. ही बिले वार्षिक सरासरीने काढण्यात आल्याने अवाजवी व चुकीची आहेत.

कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे शहरात ‘लॉकडाउन’ आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिकांचे उद्योग-व्यवसाय आणि नोकरी बंद असल्याने ही अवाजवी बिले भरणे त्यांना शक्य नाही; असे निलेश तेंडोलकर यांनी अत्रे यांच्या लक्षात आणून दिले.

यासाठी महावितणने वीज ग्राहकांची चालू मीटर रीडिंग मागवून त्यानुसार बिले आकारावीत; कोविड-१९ मुळे वीज ग्राहकांचे उत्पन्नाचे साधन बंद असल्याने मागील महिन्याची बिले भरण्यासाठी त्यांच्यावर सक्ती करू नये; वाढीव वीजबिलांबाबत तक्रारी घेऊन वीज कार्यालयात जाणाऱ्या ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी व वीजबिले भरू न शकणाऱ्या ग्राहकांची वीज कोणत्याही परिस्थितीत खंडित करू नये; अशी सूचनाही तेंडोलकर यांनी या वेळी केली.

अनेक ग्राहकांना जून महिन्याची अवाच्या सव्वा बिले दिली गेली आहेत, त्या बाबत ज्यांना आक्षेप असेल; त्यांचे समाधान आणि त्याचा योग्य निपटारा करण्यासाठी स्थानिक अभियंत्याला अधिकार द्यावेत; जेणेकरून मुख्य कार्यालयात आज मोठ्या प्रमाणात होत असलेली गर्दी टाळू शकेल. त्यानंतरही महावितरणने वीज खंडित केली तर ही कारवाई सहन न करता त्याचा जाब विचारला जाईल, असा इशाराही या वेळी तेंडोलकर यांनी दिला.

या वेळी त्यांच्यासोबत शिवसेना सचिव विवेक पाटील, तालुकाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, गटनेत्या किरण चेंदवणकर, पंचायत समिती सभापती अनुजा पाटील, वसई तालुका उपप्रमुख अतुल पाटील,हरिश्चंद्र पाटील, जिल्हा अधिकारी युवासेना धनंजय मोहिते, शहर प्रमुख प्रथमेश राऊत, गणेश बायदे, किरण म्हात्रे, शशीभूषण शर्मा उपस्थित होते.