Home ठळक बातम्या वसई विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांची अखेर बदली!

वसई विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांची अखेर बदली!

23
0

वसई : वसई-विरार शहर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने अखेर त्यांची गुरुवारी बदली झाली आहे. राज्य सरकारने 2018 मध्ये रमेश मनाळे यांची वसई-विरार शहर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती केली होती. रमेश मनाळे यांच्या बदलीचा परिणाम थेट आरोग्य यंत्रणेवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
रमेश मनाळे यांचा तीन वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांची प्रतिनियुक्ती संपुष्ठात आणावी, अशी विनंती सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय यांना केली होती. त्यानुसार रमेश मनाळे यांची प्रतिनियुक्त संपुष्ठात आणून त्यांच्या सेवा सनियंत्रित विभाग, सामान्य प्रशासन विभाग-मंत्रालय यांच्याकड़े प्रत्यावर्तित करण्यात आल्याचे आदेश दि.24 जून रोजी राज्य शासनाचे उप सचिव कैलास बधान यांनी काढून ते पालिकेला बजावले असल्याची माहिती पालिका जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
रमेश मनाळे यांच्याकडे महापालिकेतील अनेक महत्वाची अशी विविध खाती सुरुवातीपासूनच होती त्यात पालिकेच्या पूर्वेमधील सर्व प्रभाग समित्या,कोरोनाच्या संदर्भातील आरोग्य यंत्रणा, उद्यान विभाग, वृक्ष प्राधिकरण, महिला बाल कल्याण, जाहिरात याशिवाय मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त म्हणून जबाबदारी देखील त्यांच्याकडे होती.
दरम्यान, महापालिका प्रशासनात मार्च मध्ये रुजू झालेले गंगाधरन डी. यांनी आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी अनेक निर्णय घेतले होते. त्यातील काही निर्णय अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांना पटले नव्हते. त्यांनी आयुक्तांना हे निर्णय मागे घेण्याची विनंती सुद्धा केली होती.
यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय होता, तो म्हणजे महिला बाल कल्याण विभागातील कर्मचारी कमी करण्याचा होता. हे कर्मचारी कमी केल्याने त्याचा परिणाम योजनांवर झाला होता. परंतु आयुक्तांनी रमेश मनाळे यांचे काहीच न ऐकता अशा निर्णयाला केराची टोपली दाखविल्याने दिवसेंदिवस पालिकेत त्यांना काम करणे अवघड जात होते. त्यामुळेच की काय त्यांनी आपली बदली स्वतःहून करून घेतल्याची जोरदार चर्चा सध्या पालिका वर्तुळात सुरू आहे.